10 Sep 2010, 0130 hrs IST
म. टा. वृत्तसेवा
वसई रोड पश्चिमेकडील आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती नवसाला पावणारा 'वसईचा महाराजा' म्हणून ओळखला जातो. गेली चार वर्षे मंडळाने एकाच आकाराची आणि एकाच स्वरूपातील मूर्ती आणण्यास सुरूवात केली आहे. वसईचा महाराजा गणपती मंडपात स्थानापन्न झाला असून त्याच्या मराठमोळ्या फेट्यामुळे तो लोभस दिसतोय. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या लालबागच्या राजाची आठवण याला पाहिल्यावर येते.
वसई रोडमध्ये स्टेशन परिसरातील आनंद नगरमध्ये या गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९८३ मध्ये झाली. सध्या मंडळाचे २८वे वर्ष आहे. गेली चार वर्षे मंडळ एकच मूर्ती आणत आहे. राजन खातू यांनी साकारलेली ही गणेशमूर्ती मन मोहून टाकतेय. तीन दिवसांपूर्वीच महाराजाच्या मूर्तीचे वसईत आगमन झाले. तेरा फूट उंचीची ही गणेशमूर्ती मंडपामध्ये बसविण्यात आली असून, सध्या देखावा म्हणून महाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी अष्टविनायकाचे स्वखर्चाने दर्शन घेऊन गणेशोत्सवाच्या कार्याला सुरुवात करतात. मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला या परिसरात गणरायांची पूजा केली जाते. मंडळातर्फे मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन, होळी, गुढीपाडवा, स्वातंत्र्यदिन, तुलसी विवाह, कोजागिरी पोणिर्मा, दिवाळीला दीप महोत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती, नवदुर्गा उत्सव, दहीहंडी, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, विद्यार्थी गौरव असे कार्यक्रम होतात अशी माहिती अध्यक्ष विद्याधर चेंडेकर यांनी दिली.
सात दिवस चालणा-या या गणेशोत्सवासाठी कार्यर्कत्यांची फौज कामाला लागते. सर्वधर्मीय लोक उत्सवाला हातभार लावतात. गुरूवारी मूर्तीला गुलाबी रंगाचा फेटा बांधण्यात आला. त्याच्यासाठी चांदीचा हात बनविण्यात आला असून, यंदा वसईचा महाराजा हे आकर्षण ठरणार आहे.
Official Link-->http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6527329.cms
mast aahe information
ReplyDeleteGanpati bappa morya !